Sunday, May 9, 2010

इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे- रघुनाथराजे निबाळकर यांची टीका
(09-05-2010 : 2:36:14)
पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : ''मराठा समाज हा पालकत्व करणारा आणि नेतृत्व देणारा समाज आहे. त्याने मराठा समाजातील सर्व वर्गांना जवळ करावे. ज्यांनी इतिहास घडविला त्यांनी तो लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी त्याचे विकृतीकरण केले आहे,'' अशी टीका फलटणचे रघुनाथराजे निबाळकर यांनी केली.'महात्मा जोतिराव फुले इतिहास अकादमी'च्या वतीने 'पहिली मराठा इतिहास परिषद' घेण्यात आली. निंबाळकर यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. अशोक राणा अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, भाई कात्रे, राजारामबापू, डॉ. एस. सी. गंगावार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी निबाळकर म्हणाले, ''एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली, की ती खरी वाटू लागते. अशाच पद्धतीने इतिहासही लिहिला गेला आहे. तथाकथित इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासाचा गळा घोटला आहे. त्याचे बाजारीकरण केले आहे. अशा इतिहासकारांना आम्ही राजघराण्यांनीच डोक्यावर घेतले आहे.'' राजकारण्यांवर टीका करताना ते म्हणाले, ''आता राजघराण्यांचा काळ गेला, सध्या पुढाऱ्यांचा काळ आहे. इतिहास सुधारायचा असेल, तर आधी पुढाऱ्यांना सुधारावे लागेल. पण, सध्याचे राजकारणी जमिनी बळकावण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात पुढे आहेत. या पुढाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मतदान करण्याची गरज आहे.''प्रा. राणा म्हणाले, ''या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा म्हणजे नेमका कोण, हा प्रश्न निर्माण होतो. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या एका पुस्तकात मराठा कोण, याविषयी म्हटले आहे, 'जो ब्राह्यण नाही तो मराठा.' भारतीय प्राचीन इतिहासातून या विधानाला पूरक संदर्भ आढळतात. पण, मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत मोठी समस्या आहे ती क्षत्तियत्वाच्या मान्यतेची. विशेषत: शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तिचे भीषण स्वरूप पुढे आले आहे. अमराठी राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत यावर आणिखीन वाद झाले. अजूनही ती समस्या सुटलेली नाही. म्हणून या व्यासपीठावर या विषयावरही चर्चा व्हावी, असे वाटते.'कोकाटे, पोकळे यांनीही या वेळी आपल्या भूमिका मांडल्या. परिषदेच्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद होणार आहेत. प्रा. एम. एल. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहिणी कोडीतकर यांनी आभार मानले.

दिवस पहिला :--

सकाळी दहा वाजता परिषदेचे उद्‌घाटन :- फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या हस्ते.

दुपारी बारा वाजता :- "शिवकाळचे इतिहास लेखन'

दुपारी अडीच वाजता :- "शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह'

सायंकाळी पावणेपाच वाजता :- "शिव इतिहास व विविध माध्यमे चित्रण, चिकित्सा'

रात्री ७वजत :- "अभ्यासक्रमातील शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास'

रात्री नऊ वाजता :- कोल्हापूरच्या कागल येथील शिवराज्य मंचतर्फे "छत्रपती शिवाजी महाराज' हे नाटक सादर केले जाणार आहे.

दिवस दुसरा

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता :- "शिवकर्तृत्वाचे विविध पैलू' आणि "शिवकाळाचे इतिहास लेखन'

दुपारी एक वाजता :-- "शिवकालीन इतिहास लेखनाबाबत संभाव्य दिशा-दिग्दर्शन'

दुपारी अडीच वाजता :- "शिवकालीन विस्थापितांचा दुर्लक्षित इतिहास'

सायंकाळी पावणेपाच वाजता :- "इतिहास लेखकांकडून अपेक्षा'

No comments: